‘त्या’ तरुणाच्या पालकांना ७३ लाखांची भरपाई; मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 08:58 AM2022-01-04T08:58:58+5:302022-01-04T08:59:03+5:30
न्यायाधिकरणाने अलीकडच्या काही महिन्यात दिलेल्या नुकसान भरपाईपैकी ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१६ मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पालकांना ७३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने अवजड वाहन मालक व इन्शुरन्स कंपनीला दिले.
न्यायाधिकरणाने अलीकडच्या काही महिन्यात दिलेल्या नुकसान भरपाईपैकी ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना न्यायाधिकरणाने म्हटले की, २४ वर्षीय अजिन मॅथ्यू हा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी होता. त्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ८८ हजार रुपये इतके होते.
कॅपजेमिनी कंपनीच्या एचआरनेही न्यायाधिकरणात साक्ष नोंदवली. दुर्घटनेच्या दोन महिन्यापूर्वीच मॅथ्यूला ज्येष्ठ अभियंता म्हणून बढती मिळाली होती. त्याचबरोबर वेतनवाढही देण्यात आल्याचे, कंपनीच्या एचआरने न्यायाधिकरणाला सांगितले. त्याचबरोबर न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना मॅथ्यूच्या पालकांनी सादर केलेले पुरावेही गृहित धरले. या कागदपत्रांवरून मॅथ्यू अत्यंत हुशार मुलगा असल्याचे सिद्ध करण्यात आले. त्याच्या पालकांनी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी न्यायाधिकरणाकडे केली होती.
काय आहे प्रकरण ?
n३० जून २०१६ रोजी जोगेश्वरीमध्ये राहणारा मॅथ्यू रात्री पावणेनऊच्या सुमारास बाईकवरून घरी परतत असताना समोरून वेगाने येणाऱ्या डम्परने त्याच्या बाईकला पवईत धडक दिली. अपघात होताच डम्पर चालकाने पळ काढला. nमॅथ्यूला तातडीने पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.