Join us

'जेट' एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी भरपाई योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

मुंबई : जेट एअरवेजच्या खरेदी प्रस्तावास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने मंजुरी दिल्यानंतर ही विमान कंपनी नव्या रूपात सुरू करण्याचा ...

मुंबई : जेट एअरवेजच्या खरेदी प्रस्तावास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने मंजुरी दिल्यानंतर ही विमान कंपनी नव्या रूपात सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंपनीचे नवे भागधारक असलेल्या कालरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांनी ‘जेट’च्या माजी कर्मचाऱ्यांसाठी भरपाई योजना (रिवाइव्हल प्लॅन) आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कालरॉक आणि जालान यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या समितीने जेटच्या माजी कर्मचाऱ्यांना भरपाई देण्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार कंपनीची ०.५ टक्के हिस्सेदारी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यात ग्राउंड स्टाफचाही समावेश असेल. या प्रस्तावास ९५ टक्के कर्मचाऱ्यांची अनुमती आवश्यक असून, ती एका महिन्याच्या आत कंपनीला कळविणे बंधनकारक आहे, अशी माहिती जेटच्या एका माजी वरिष्ठ कर्मचाऱ्याने दिली.

त्याशिवाय रोख स्वरूपात २२ हजार ८०० रुपये देण्यात येतील. त्यातील ११ हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वापरासाठी, ५ हजार १०० रुपये वैद्यकीय देयक, ५ हजार १०० रुपये शालेय शुल्क, १ हजार १०० रुपये शालेय साहित्य आणि ५०० रुपये मोबाइल रिचार्जसाठी वापराकरिता देण्यात येणार आहेत, तसेच विमान प्रवासासाठी १० हजार रुपयांचे क्रेडिटही दिले जाईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

आयफोन, आयपॅड आणि लॅपटॉप...

रोख रकमेव्यतिरिक्त प्रत्येक कर्मचाऱ्याला आयफोन, आयपॅड किंवा लॅपटॉप यापैकी एक उपकरण देण्यात येईल. लॉटरी किंवा रँडम पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यापासून १८० दिवसांच्या आत उपकरण कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येईल. ५ ऑगस्टपर्यंत किमान ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावास मंजुरी देण्याची गरज आहे. त्यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना संपर्क सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.