Join us

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

वैमानिकांच्या संघटनेची उच्च न्यायालयात धावलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किंवा कोरोनाचा संसर्ग झालेल्या वैमानिकांना ...

वैमानिकांच्या संघटनेची उच्च न्यायालयात धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किंवा कोरोनाचा संसर्ग झालेल्या वैमानिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच त्यांचे लसीकरण आधी करावे आणि त्यांचा विमा काढण्यात यावा, यासाठी वैमानिकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वैमानिक अत्यावश्यक सेवा पुरवतात. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना १० कोटी रुपयांचे सानुग्रह-अनुदान देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलटने याचिकेद्वारे केली आहे.

फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत १३ वैमानिकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मार्च २०२० पासून ‘वंदे भारत’अंतर्गत सर्व वैमानिक रात्रंदिवस काम करत आहेत. परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात आणणे आणि वैद्यकीय साहाय्यतेसाठीही विमानांचा वापर करण्यात आला. यादरम्यान, अनेक वैमानिकांचा मृत्यू झाला आणि बऱ्याच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर काही जणांना म्युकरमायकोसिसमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले. कोरोनाच्या काळात वैमानिक स्वतःचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यात भर म्हणजे २०२० पासून वेतनकपातही करण्यात आली आहे, असे जनहित याचिकेत म्हटले आहे.

वैमानिकांचा समावेश ‘फ्रंटलाइन वर्कर्स’मध्ये करून त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी, यासाठी इंडियन पायलट गिल्डने केंद्र सरकारपुढे निवेदन केले. तरीही कोरोनाने मृत्यू पावलेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतीही योजना नाही, असे याचिकेत म्हटले आहे.