उस्मानाबादच्या नळदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती मुंबईत साकारली; बघणाऱ्यांची गर्दी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 05:36 PM2021-11-09T17:36:29+5:302021-11-09T17:36:44+5:30
कांदिवलीच्या चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य असा किल्ला साकारण्यात आला.
मुंबई – दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके आलेच पण त्याचसोबत महाराष्ट्रात दिवाळीत गडकिल्ले बनवण्याची ओढ कायम लागलेली असते. गावाकडे बच्चे कंपनी दिवाळीत किल्ले बनवतात. त्यावर छत्रपती शिवराय आणि मावळे विराजमान होतात. पण मुंबईतही अनेक भागात गडकिल्ले बनवले जातात. काही ठिकाणी गडकिल्ले बनवण्याची स्पर्धाही आयोजित केली जाते.
कांदिवलीच्या चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य असा किल्ला साकारण्यात आला. अनेक समाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभाह घेणाऱ्या या संस्थेकडून यंदाही हा उपक्रमक राबवण्यात आला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले स्पर्धांमध्ये मंडळाने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानकडून बनवण्यात आलेला किल्ल्याची प्रतिकृती बघायला अनेक मान्यवर उपस्थित राहतात.
साहेब प्रतिष्ठान, गोराई यांच्यावतीने दरवर्षी दुर्ग बांधणी स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी संस्थेने बनवलेल्या मल्हार गडाच्या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ तर दुसऱ्या वर्षी बनवलेल्या विजयदुर्ग आणि तिसऱ्या वर्षी बनवलेल्या जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. चौथ्या वर्षी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती, तेव्हा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. गेल्या वर्षी मुंबई जवळील किल्ले वसईची प्रतिकृती संस्थेकडून बनवण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठानने उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला बनवण्यात आला आहे. दरवर्षी किल्ला बनवण्यापूर्वी संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून संबंधित किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी केली जाते. त्यानंतर या किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते अशी माहिती संस्थेचे सचिव संदीप जोशी यांनी दिली.