मुंबई : अमराठी भाषिक अधिक असलेल्या दक्षिण मुंबईत आघाडी आणि युतीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मात्र ४० टक्के मराठी मतदारांची मत या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी मराठी मतदारांकडे धाव घेतली आहे. ताडदेव, गिरगाव, शिवडी, करी रोड या मराठी वस्त्यांमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हा धोका ओळखत काँग्रेसने व्हिडिओ काढून मराठी मतदारांबरोबर जवळकी साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
दक्षिण मुंबईत सुमारे साडेपंधरा लाख मतदार आहेत. यातील सहा लाख दहा हजार मराठी मतदार आहेत, उत्तर भारतीय एक लाख ९५ हजार, गुजराती, राजस्थानी, जैन सुमारे दोन लाख २० हजार याप्रमाणे अमराठी मतदारांची संख्या ६० टक्के आहेत. मात्र केवळ अमराठी मतांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकेल, याचा अंदाज काँग्रेसला येऊ लागला आहे. शिवसेना उमेदवार अरविंद सावंतही सर्वत्र प्रचार केल्यानंतर आपल्या बालेकिल्ल्यात परतले आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. भाजपचे पारंपारिक मतदार आणि मराठी मते शिवसेनेला बळ देण्याचा धोका असल्याने काँग्रेस धास्तावले आहे. प्रतिष्ठेची ही लढत जिंकण्यासाठी काँग्रेसने प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कामगिरीलाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे व्हिडिओवर व्हिडिओ सोशल मीडियातून फिरवण्यात येत आहेत. मराठी मतदारांच मने जिंकण्यासाठी काँग्रेसने त्यांच्याशी संवाद साधणारा व्हिडिओ जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेतूनही नाराजीचा सूर उमटत आहे. प्रचाराच्या उर्वरित दीड दिवसांत शिवसेना-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप आणखी वाढत जाण्याची चिन्हे आहेत.