‘त्या’ रिपोर्टवर तक्रारदाराचा आक्षेप; शाहरूख खान वानखेडे स्टेडियम शिवीगाळ प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:21 AM2017-09-17T03:21:20+5:302017-09-17T03:21:28+5:30
आयपीएल सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमवरील शिवीगाळ प्रकरणी पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला क्लीन चिट दिली. या केससंबंधी दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला.
मुंबई : आयपीएल सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमवरील शिवीगाळ प्रकरणी पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला क्लीन चिट दिली. या केससंबंधी दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र या रिपोर्टवर तक्रारदार अमित मारू यांनी शनिवारी आक्षेप घेतला.
सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करणाºया अमित मारू यांनी शाहरूख खानने लहान मुलांसमोर शिवीगाळ केल्याप्रकरणी सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन आॅफ चाइल्ड राइट्समध्ये तक्रार नोंदवली. आयोगाने मरिन ड्राइव्ह पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे आदेशही दिले. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मारू यांनी दंडाधिकारी न्यायालयात शाहरूख खानविरुद्ध खासगी तक्रार नोंदविली.
त्यानंतर न्यायालयाने मरिन ड्राइव्ह पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. २०१२ मध्ये शाहरूखला आयपीएलचा सामना संपल्यानंतर त्याच्या मुलांसह स्टेडियमवर येण्यास मनाई केल्याबद्दल त्याने तेथील सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविला.
याबाबत चौकशी पूर्ण झाल्यावर पोलिसांनी शाहरूखला क्लीन चिट दिली. घटनेवेळी शाहरूखने मद्यपान केले नव्हते. तसेच त्याने सुरक्षारक्षकाला शिवीगाळही केली नाही. त्यामुळे लहान मुलांसमोर शिवीगाळ करण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे म्हणत पोलिसांनी या केसबाबत क्लोजर रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केला.
मात्र या अहवालावर अमित मारू यांच्यातर्फे त्यांचे वकील आदित्य प्रताप यांनी आक्षेप घेतला आहे. शाहरूखने स्टेडियवर शिवीगाळ केल्याचे व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांकडे व युट्युबवर उपलब्ध आहेत. तरीही पोलीस शाहरूखला क्लीन चिट देत आहेत. म्हणून केस बंद करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सुनावणी तहकूब
केस बंद करण्यात येऊ नये, अशी विनंती आदित्य प्रताप यांनी केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.