५ वर्षांत २० अनधिकृत लॅँबविरोधात तक्रारी
By admin | Published: February 2, 2015 02:53 AM2015-02-02T02:53:08+5:302015-02-02T02:53:08+5:30
कोणताही अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मनात पकडले जाण्याची भीती सतत असते. पण अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब चालवणारे त्यात मोडणारे नाहीत.
पूजा दामले, मुंबई
कोणताही अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मनात पकडले जाण्याची भीती सतत असते. पण अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब चालवणारे त्यात मोडणारे नाहीत. कारण या लॅबवर कारवाई होऊ शकत नाही, असे चित्र उभे केले जात आहे. पण प्रत्यक्षात गेल्या ५ वर्षांत राज्यातील विविध ठिकाणी २० अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबच्या विरोधात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रो बायोलॉजिस्टकडून एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
अनेक वेळा कोणताही आजार नसतानाही भयंकर आजार असल्याचे रिपोर्ट अनधिकृत लॅबद्वारे दिले जातात. काही वेळा वेगळ््याच आजाराचे निदान केले जाते. अशा प्रकारांमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होतो.
हे रोखण्यासाठी अनधिकृत लॅब बंद झाल्या पाहिजेत. याच उद्देशाने असोसिएशने गेल्या पाच वर्षांत स्वत:हून २० अनधिकृत लॅबविरोधात पोलिसांकडे एफआयआर नोंदवले आहेत. यापैकी काही ठिकाणी न्यायालयीन सुनावणी सुरू आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष संदीप यादव यांनी सांगितले.
पण अशा प्रकारच्या कारवाया मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना काही प्रश्न विचारल्यावर ‘आम्ही करू शकतो, असा कोणताही नियम नाही’ अशी सडेतोड उत्तरे त्यांच्याकडून मिळतात. काही डीएमएलटी हे डॉक्टरच्या परवानगीने त्याचे नाव वापरतात, तो डॉक्टर कधीच तिकडे फिरकतही नाही. तर काही जण हे डॉक्टरला न सांगता त्याचे नाव वापरतात.
काही जण डीएमएलटी असूनही रिपोर्टवर सर्रास सही करतात. अशा प्रकारे सावळागोंधळ करून पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात फोफावल्या असल्याचे आढळून आलेआहे. (समाप्त)