Join us

भाजपाच्या जाहिरातीविरोधात सेनेची तक्रार

By admin | Published: February 22, 2017 5:00 AM

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मुंबई फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग

मुंबई : प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मुंबई फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या जाहिराती भाजपाला पूरक होत्या असा दावा करीत ‘मुंबई फर्स्ट’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान याच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. युवा सेनेचे पदाधिकारी अ‍ॅडव्होकेट धर्मेंद्र मिश्रा यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपलेला असताना मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या जाहिरातींमध्ये बॉलीवूड अभिनेता आमीर खानचा फोटो वापरला आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी मतदान करा, विकासासाठी स्वच्छ आणि चांगले प्रशासन निवडून देण्यासाठी मदत करा, पारदर्शक कारभार आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाला मतदान करण्याचे आवाहन या जाहिरातीद्वारे करण्यात आले. हा अप्रत्यक्षपणे भाजपाचा प्रचार असून मतदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)