मुंबई : गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून देशभर सफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही या अभियानाचे आयोजन करताना रेल्वे राज्यमंत्र्यांकडून उपस्थिती दर्शविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असतानाही मंत्र्याने उपस्थिती दर्शवल्याने आणि रेल्वेने त्यांच्या कार्यक्रमास प्रसिद्धी दिल्याने रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे अधिका:यांविरोधात राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. वकील धमेंद्र मिश्र यांनी ही तक्रार केली आहे.
या अभियानासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उपस्थिती लावली. सिन्हा यांनी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल येथील आणि मध्य रेल्वेच्या सीएसटी येथील सफाई अभियानात सहभाग दर्शविला. हा या वेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह अन्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. तर रेल्वे पोलिसांची सुरक्षाही त्यांच्या दिमतीला होती. रेल्वेकडून सिन्हा यांना सफाई अभियानादरम्यान दिलेला सरकारी लाभ आणि प्रसिद्धी पाहता आचारसंहितेचा भंग असून, त्याविरोधात राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे वकील धमेंद्र मिश्र यांनी तक्रार केली.
याबाबत मिश्र यांनी सांगितले की, निवडणुकीची आचारसंहिता असतानाही सफाई अभियानाच्या कार्यक्रमाद्वारे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना प्रसिद्धी दिली. तसेच त्यांना अन्य सरकारी सुविधांचाही लाभ दिला. मुळात हा आचारसंहितेचा भंग असून, त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यात प्रथम रेल्वे अधिका:यांवर कारवाई करतानाच रेल्वे राज्यमंत्र्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.(प्रतिनिधी)