अल्पवयीन मुलीची वडिलांविरोधात तक्रार
By admin | Published: April 29, 2017 01:55 AM2017-04-29T01:55:16+5:302017-04-29T01:55:16+5:30
घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीचा कोपरखैरणे पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई : घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीचा कोपरखैरणे पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. या वेळी चौकशीदरम्यान सदर मुलीने पित्याकडूनच लैंगिक अत्याचार होत असल्याने मित्रासोबत पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले आहे; परंतु मुलीने वैद्यकीय चाचणीला नकार दिल्याने बाल कल्याण कमिटीला यासंबंधी कळवून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहणारी १७ वर्षीय मुलगी पळून गेल्याची तक्रार गुरुवारी दाखल झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने दुसऱ्याच दिवशी या मुलीचा शोध घेतला. शुक्रवारी संध्याकाळी तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता, तिने वडिलांवरतीच लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. वडिलांकडून लैंगिक अत्याचार होत असल्यामुळे आपण मित्राच्या मदतीने घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले; परंतु पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले असता, तिने नकार दिला आहे. यामुळे तिच्या तक्रारीत सत्यता आहे की नाही, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने महिला व बाल कल्याण कमिटीला तिच्याबाबत माहिती देऊन त्यांच्या समक्ष जबाब नोंदवण्यात आला आहे. तर याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)