PMC Bank : पीएमसी बँकेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:46 AM2019-09-27T03:46:37+5:302019-09-27T03:46:49+5:30

PMC Bank : खातेदारांची सायन पोलिसांत धाव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Complaint against PMCBank against the financial crime branch | PMC Bank : पीएमसी बँकेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

PMC Bank : पीएमसी बँकेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

Next

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र बँकेने (पीएमसी) ठेवीदारांच्या ३ हजार कोटींच्या रकमेची लूट केल्याचा आरोप करत गुरुवारी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर बँकेतील खातेदारांनी सायन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळ, एचडीआयएलच्या संगनमताने सुमारे सव्वानऊ लाख ठेवीदारांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून लेखी तक्रार अर्जाद्वारे केला. या प्रकरणी सखोल तपास गरजेचा आहे. रिझर्व्ह बँकेनेही पीएमसी आणि एचडीआयएल विरुद्ध कायदेशीर कारवाईसंबंधी ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.

बँकेने कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता न करता ३ हजार कोटींहून अधिक रक्कम एचडीआयएलसह बेनामी कंपन्यांना दिल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे. बँकेची चौकशी करताना पुन्हा ती सुरळीत सुरू होईल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तर दुसरीकडे, सायनमधील काही बँकेच्या खातेधारक तक्रारदारांनी गुरुवारी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यात बँकेच्या सदस्यांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधितांचे पासपोर्ट जप्त करावे, जेणेकरून ते कुठेही पळून जाऊ नयेत, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तर, गुंतवणूकदारांचे तक्रार अर्ज घेतले असून तपासाअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी सांगितले.

‘दहा हजार देण्यास चेंबूरमधील बँकेचा नकार’
आरबीआयने पीएमसी बँकेतून १० हजार रुपये काढण्यास परवानगी दिल्यानंतर खातेदारांनी पीएमसीच्या शाखांमध्ये गर्दी केली होती.
परंतु बँकेने ग्राहकांना १० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पीएमसीच्या चेंबूर येथील शाखेत हा प्रकार पाहावयास मिळाला.
बँक कर्मचाऱ्यांना पैसे न देण्याचे कारण विचारले असता, ‘आरबीआयने ग्राहकांना १० हजार रुपये देण्याची परवानगी दिलेली आहे, परंतु जारी केलेल्या नोटीसमध्ये तारखेचा उल्लेख नसल्याने बँक प्रशासनाने आम्हाला ग्राहकांना १० हजार रुपये देण्यास नकार दिला आहे. बँक प्रशासन आम्हाला परवानगी देत नाही तोवर आम्ही पैसे देऊ शकत नाही. यामुळे ग्राहकदेखील बँक कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागले.’ आरबीआयने १० हजार रुपये देण्यास परवानगी दिली आहे तर बँक ग्राहकांना पैसे का देत नाही, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात होता. काही ग्राहकांनी पैसे मिळाल्याशिवाय बँकेतून हलणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

Web Title: Complaint against PMCBank against the financial crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.