मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील विरा देसाई रोडसमोरील पारूल अपार्टमेंट या इमारतीच्या परिसरात ‘मोजो’ नावाची श्वान मादी जवळपास एक वर्षापासून राहत आहे. या श्वानाने अडीच महिन्यांपूर्वी इमारतीच्या आवारात चार पिल्लांना जन्म दिला. श्वान आणि तिची पिल्ले सोसायटीमध्ये दुर्गंधी पसरवत असल्याकारणाने पिल्लांना रहिवाशांनी आईपासून वेगळे केले. याबाबत आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, सोमवारी ही चार पिल्ले पुन्हा सोसायटीमध्ये आली असून प्राणिप्रेमींना सुखद धक्का बसला होता. या पिल्लांना पुन्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही प्राणिप्रेमींनी व्यक्त केली आहे.स्थानिक रहिवासी पूजा रायकर म्हणाल्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास श्वानाच्या पिल्लाचा आवाज आला नाही. त्यानंतर इमारतीच्या आवारात येऊन पिल्लांचा शोध घेतला. परंतु पिल्ले काही दिसली नाहीत, पण मोजो दिसली असून तीसुद्धा पिल्ले दिसत नसल्यामुळे काबरीबावरी झाली होती. इमारतीच्या खालच्या दिशेने लावलेल्या सीसीटीव्हींचे फूटेज पाहिले असता २३ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजता अंदाजे २५ वर्षे वयाच्या दोन अनोळखी व्यक्ती दिसून आल्या. त्यापैकी काळे शर्ट व पॅन्ट घातलेल्या एकाने पिल्लाला गाडीखालून जबरदस्तीने ओढून काढले आणि कम्पाउंडच्या बाहेरच्या बाजूला फेकल्याचे दिसले. त्यानंतर फेकलेले पिल्लू परत गेटमधून आत आले.दुसरा इसम आत आलेल्या पिल्लासह आणखी एक पिल्लू घेऊन बाहेर गेल्याचे दिसले. थोड्या वेळाने जो इसम हातात पिल्ले घेऊन गेला होता तो परत आतमध्ये येऊन दुसरी दोन पिल्ले घेऊन जाताना दिसले. श्वानाच्या दूधपित्या पिल्लांना त्यांच्या आईपासून वेगळे करून उपाशी ठेवले व त्यांना अनोळखी ठिकाणी फेकून देऊन क्रूर वागणूक दिली. तसेच त्यांचा जीव धोक्यात येईल अशी कृती केली. या घटनेमागे स्थानिक असल्याचा संशय व्यक्त असून २५ नोव्हेंबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. अभिनेत्री उत्कर्षा नाईक या गेल्या तीन दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या वाºया करीत होत्या.प्रत्येक इमारतीमध्ये दोन प्रकारचे रहिवासी राहतात. एका रहिवाशाला प्राण्यांबाबत प्रेम असते, तर दुसरे रहिवासी प्राण्यांना क्रूरपणे वागणूक देतात. श्वानांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले, तर भविष्यात सुरक्षारक्षकांना पगार देऊन ठेवण्याची गरजही भासणार नाही. लवकरच एक संस्था स्थापन करून प्रत्येक सोसायटीतील श्वानांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून सोसायटीचे संरक्षण होईल.- मयूरी परब, प्राणिमित्र
श्वानाच्या पिल्लांना हाकलणाऱ्या सोसायटीविरोधात तक्रार, पिल्ले परतल्याने प्राणिप्रेमींना सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:04 AM