मुंबई : तहेलका मासिकाच्या वादग्रस्त लिखाणाविरोधात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दादर शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तेहलकाने आपल्या ताज्या अंकात याकूब मेमनच्या फाशीच्या निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाविरोधातही तेहेलका मासिकाने आक्षेपार्ह लिखाण केले आहे. याच अंकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. याकूब मेनन, दाऊद इब्राहीम, भिंद्रनवाला यांच्या रांगेत बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र छापत ‘सर्वात मोठा दहशतवादी कोण’ अशी मल्लिनाथी या मासिकाने केली आहे. अशा प्रकारचे लिखाण करुन मासिकाने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याविरोध केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. सरकार दुटप्पी असल्याचे लेखात म्हटले आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनीही तेहेलकाच्या वादग्रस्त लिखाणावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली. प्रखर राष्ट्रवादी भूमिका घेणा-या बाळासाहेबांनी आपल्या कष्टाने जनमानसात स्थान मिळवले. बाळासाहेबांना दहशतवाद्यांच्या रांगेत बसवून मासिकाच्या संपादकांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्याची टीका शेलार यांनी केली. तसेच सर्व सुजाण नागरीकांनी अशा लिखाणाचा निषेध करायला हवे, असे आवाहनही शेलार यांनी केले.
तहेलकाविरोधात तक्रार
By admin | Published: August 16, 2015 2:26 AM