मुंबई : तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे कारण देऊन गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने खार येथे राहणाऱ्या व्यक्तीवरील विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीनेच त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार करण्यास आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास अतिशय विलंब झाला. घटना घडल्यानंतर पाच वर्षांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. मात्र, गुन्हा नोंदविण्यास विलंब झाल्याने तो रद्द करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
फेब्रुवारी, २०१९ मध्ये मुलीच्या आईने याचिकादाराविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर आयपीसी व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविला. याचिकदाराच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, तो त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलीसमोर विवस्त्र होऊन आंघोळ करत असे व मुलीला अयोग्यरीतीने स्पर्श करीत असे. मात्र, पत्नीने केलेला आरोप त्याने फेटाळला. पत्नीने बदला घेण्यासाठी गुन्हा नोंदविला. माझ्याबरोबर मुलगी नीट राहते, असे म्हणत, त्याने मुलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सादर केले. तर पत्नीतर्फे अॅड. आदित्य प्रताप यांनी याचिकादाराचे म्हणणे फेटाळले. पत्नीची संपूर्ण तक्रार एकत्रपणे वाचली, तर तिचे म्हणणे समजेल. गुन्हा घडल्याचे सिद्ध होईल, शिवाय या प्रकरणाचा आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे सांगितले.आता ट्रायल कोर्टापुढे होणार साक्षसीआरपीसी कलम १६४ अंतर्गत अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदविला आहे. आता ट्रायल कोर्टापुढे तिची साक्ष झाल्याशिवाय गुन्हा रद्द करता येणार नाही, असे अॅड. आदित्य प्रताप यांनी न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत खार येथे राहणाºया व्यक्तीवरील विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.