शासकीय काम वेळेत होत नाही, अशी करा ऑनलाइन तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:07 AM2024-02-12T10:07:03+5:302024-02-12T10:08:22+5:30
सध्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत.
मुंबई : शासकीय काम वेळेत होत नसल्यास ‘आपले सरकार’ या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करता येते. २१ दिवसांत या तक्रारींचे निवारण करणे अनिवार्य आहे. आजघडीला विविध विभागांच्या मिळून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत.
ऑनलाइन पर्याय :
कोणतेही शासकीय काम वेळेत होत नसल्यास अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तुमच्या मोबाइल किंवा संगणकाद्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही केलेल्या तक्रारीचे ऑनलाइन स्टेटससुध्दा चेक करू शकता.
शासनाच्या अधिकृत आपले सरकारच्या पोर्टलवर निःशुल्क कोणत्याही विभागाची तक्रार ऑनलाइन करू शकता.
अगदी सरपंचपासून ते मंत्रालय विभागापर्यंत तक्रारी करू शकता.
१२ महिन्यांत ५ हजार तक्रारी :
आजघडीला विविध विभागांच्या मिळून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आहेत. राज्यभरातून या तक्रारी केल्या जातात. त्याची २१ दिवसात दखल घेणे गरजेचे असते.
११ हजार तक्रारींचे निराकरण :
संकेतस्थळावर राज्याच्या कोनाकोपऱ्यातून १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या. या सर्व तक्रारींची पडताळणी करून यापैकी ११ हजार तक्रारींचे निवारण झाले आहे.
तांत्रिक अडचणीत हेल्पलाइन उपलब्ध :
ऑनलाइन तक्रारी केल्यानंतर किंवा आपली काही अडचण असल्यास आपण या नंबरवर फोन करून १८००१२०८०४० या हेल्पलाइनवर मदत घेता येते.
सर्वाधिक तक्रारी पोलिस, नगर विकासच्या :
संकेतस्थळावरील १ लाख ४५ हजार तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी पोलिस विभागाच्या २२ हजार ५७५ आणि नगरविकास विभागाच्या १८ हजार २०३ आहेत.