Join us

राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी केल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 6:35 AM

पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्याची तक्रार श्रोत्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.१५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला हा प्रकार समोर आला आहे. ७५ कलावंतांना घेऊन पुष्कर श्रोत्री यांनी राष्ट्रगीत तयार केले होते. यामध्ये निळू फुले यांच्यापासून ते आजच्या नवीन कलाकारांपर्यंत असंख्य कलाकारांनी सहभाग घेतला होता. हे राष्ट्रगीत विविध चित्रपटगृहांमधून दाखवण्यासाठीही देण्यात आले होते. मात्र वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रगीत सादर करण्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होतो, अशी एक तक्रार दाखल झाली. पुढे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसारच राष्ट्रगीत चित्रपटगृहातून दाखवले जावे, असे आदेश आले. त्यामुळे विविध कलावंतांनी तयार केलेली सगळ््या प्रकारची राष्ट्रगीते चित्रपटगृहातून काढून टाकण्यात आली. फडकणारा तिरंगा ध्वज आणि राष्ट्रगीत एवढेच चित्रपटगृहातून दाखवले जाऊ लागले. मात्र, देवेंद्र खंडेलवाल यांनी स्वत:च्या निर्मितीमध्ये अशा प्रकारचे एक राष्ट्रगीत तयार करून चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यासाठी दिल्याचा पुष्कर श्रोत्री यांचा दावा आहे. या राष्ट्रगीतासाठी वापरण्यात आलेला आवाज हा श्रोत्री यांनी तयार केलेल्या राष्ट्रगीतामधीलच आहे. आपण त्याची आॅडिओ टेस्टही करून घेतल्याचे श्रोत्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणाची आपण संस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही तक्रार केली. तसेच मुख्यमंत्र्यांनाही आपण लेखी पत्र देत आहोत. शिवाय पोलिसात ही तक्रार करत असल्याचे श्रोत्री यांनी सांगितले १५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला हा प्रकार उघडकीस आला हे अत्यंत खेदजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :पुष्कर श्रोत्रीमुंबई