लाचलुचपतची तक्रार फेसबुक, वेबसाईटवरही स्वीकारणार

By Admin | Published: September 11, 2014 10:35 PM2014-09-11T22:35:53+5:302014-09-11T23:07:22+5:30

दिगंबर प्रधान यांची माहिती -थेट संवाद

Complaints about bribery can be accepted on Facebook, also on the website | लाचलुचपतची तक्रार फेसबुक, वेबसाईटवरही स्वीकारणार

लाचलुचपतची तक्रार फेसबुक, वेबसाईटवरही स्वीकारणार

googlenewsNext

प्रश्न : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अलीकडे कारवाई वाढली आहे, याची कारणे काय?
उत्तर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे प्रमाण वाढले आहे. याला मुख्य कारण म्हणजे तक्रारदारांचा या विभागावर वाढलेला विश्वास आणि विभागाने राबविलेली व्यापक जनजागृती मोहीम. आॅगस्ट महिन्यातच गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी १२६ टक्के कारवाई झाली आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत ८४९ सापळे रचले, यामध्ये ११६३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात खूप मोठे बदल झाले आहेत. तक्रारदाराचे वैध काम असल्यास त्याचे लवकरात लवकर काम होण्यासाठी आपला विभाग त्याला मदत करतो. तक्रारदाराने तक्रार देताना मोठी जोखीम पत्करली असेल तर ती जोखीम आम्ही स्वत:ची समजून त्याला योग्य ते संरक्षण देतो. पुढेही त्याला याबाबत कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेतो. अनेकदा त्याचे नाव गोपनीय ठेवूनच आम्ही तपास पूर्ण करतो. त्याचबरोबर तक्रारदाराने लाच देताना दिलेले पैसे त्याला दहा दिवसात परत मिळतील, अशीही व्यवस्था आपल्या विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदारांना आता खूपच सोयीचे झाले आहे. त्यामुळे सध्या तक्रारीही वाढल्या आहेत आणि कारवाईही जलद होत आहे.
प्रश्न : कारवाईमध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा काय वापर चालू आहे?
उत्तर : काळानुरूप हा विभागही आता बदलला आहे. नवीन तंत्रज्ञान आणले आहे. संशयित सावध होऊ नये यासाठी सर्व माहिती देणे उचित ठरणार नाही. आवाज स्पष्ट रेकॉर्डिंग होईल, घटनेच्या ठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तक्रारदार आता वेबसाईटवरही तक्रार करू शकणार आहेत. आमची वेबसाईट, फेसबुकवरही आम्ही तक्रार स्वीकारत आहोत. काहीजणांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असल्यास त्या तक्रारींची दखल आम्ही घेतो. तक्रारदाराचे नावही अत्यंत गोपनीय ठेवतो. सापळा रचण्यासाठी मात्र तक्रादारांनी पुढे आले पाहिजे. १०६४ हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. यावरुनही नागरिक तक्रार करू शकतात.
प्रश्न : लाचलुचपतच्या जाळ्यापासून अधिकारी वर्ग नामानिराळा रहात आहे?
उत्तर : अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कनिष्ठ कर्मचारी लाच स्वीकारतात. कारवाईत कर्मचारी सापडतात; मात्र वरिष्ठ अधिकारी नामानिराळे रहात आहेत. यासाठी कसून तपास होणे आवश्यक आहे. लाचलुचपत विभाग कोणालाही पाठीशी घालत नाही. तपासात अधिकाऱ्यांचे नाव उघडकीस आल्यास किंवा लाच मागताना तडजोडीवेळी अधिकाऱ्याचे नाव आल्यास त्याची कसून चौकशी होतेच. अशी अनेक उदाहरणे देता येतील की कर्मचाऱ्याकडे केलेल्या चौकशीनंतर अधिकाऱ्यावरही कारवाई झालेली आहे.
प्रश्न : लाचखोरांना होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण अद्याप वीस टक्क्यापेक्षा कमीच आहे?
उत्तर : अनुभवातून माणूस शहाणा होतो, त्याप्रमाणे आरोपी कसा सुटला, याचा अभ्यास करुन पुढील आरोपी शिक्षेपासून वाचू नये याची दक्षता घेतली जाते. अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे सुरू आहे. कायदे तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात येतो. तपासात त्रुटी राहणार नाही, पंच, साक्षीदार फुटणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे अलीकडे शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. याचा धाकही आता निर्माण झाला आहे. शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे.
प्रश्न : एकूण भ्रष्टाचाराच्या किती टक्के तक्रारी होतात?
उत्तर : हे प्रमाण सांगणे तसे अवघड आहे; मात्र तक्रारी आता बिनधास्त होत आहेत, हे नक्की. लोकांमधून भ्रष्टाचाराविरोधात उठाव होत असून ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. केवळ शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजेच जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत सदस्यापासून ते पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही ग्रामस्थ तक्रारी करू शकतात. कोणत्याही खासगी व्यक्तीविरुध्दही कारवाई होऊ शकते. त्यामुळे लाचेची मागणी करणाऱ्याविरुध्द आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे.

अंजर अथणीकर

Web Title: Complaints about bribery can be accepted on Facebook, also on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.