मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी!

By Admin | Published: May 26, 2015 02:42 AM2015-05-26T02:42:01+5:302015-05-26T02:42:01+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पुरेसा वेळ देत नाहीत, अशी तक्रार भाजपाच्याच काही सहकारी मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Complaints against the Chief Minister! | मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी!

मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी!

googlenewsNext

फडणवीस वेळ देत नाहीत : पक्षाध्यक्ष शहांपुढे मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
यदु जोशी - मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पुरेसा वेळ देत नाहीत, अशी तक्रार भाजपाच्याच काही सहकारी मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अशाच तक्रारीचा सूर भाजपाच्या आमदारांनी यापूर्वीच लावलेला आहे.
मुख्यमंत्री दैनंदिन कार्यक्रमांत अतिशय व्यस्त असतात. मंत्रालयीन बैठका, फायलींचा निस्तारा आणि दौरे अशा व्यस्ततेमुळे सहकारी मंत्री आणि आमदारांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळच नसतो. मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही, अशी आजवर आमदारांची तक्रार होती. आता मंत्रीही तीच री ओढत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी असलेल्या या नाराजीला पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोरच वाचा फोडली. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये शहा यांनी राज्यातील सर्व भाजपा मंत्र्यांची बैठक घेतली.

माझ्याविषयी अशी कोणतीही तक्रार झालेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आरटीआयबाबत शहांचे निर्देश
माहिती अधिकाराचा कायदा चांगलाच आहे, पण अनेकदा सरकारची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्याचा वापर अनेकांकडून केला जात असतो. मंत्र्यांचा विमानप्रवास वा अन्य मुद्द्यांवरून मग सरकारची बदनामी केली जाते.

आरटीआयमध्ये कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सरकारकडूनही या माहितीचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे, असे निर्देश शहा यांनी दिले.

च्मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत असले, तरी नेहमी व्यग्र असतात, मंत्र्यांना वेळ देऊ शकत नाहीत, असा सूर एका ज्येष्ठ मंत्र्यांनी लावला. मात्र, शहा यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे समजते.

च्मंत्र्यांना आपापल्या विभागातील धोरणात्मक निर्णयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर निर्णय घ्यावयाचे आहेत, पण त्यांना मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नाही. नियोजित बैठकाही ऐनवेळी रद्द केल्या जातात, असा अनुभव अन्य एका ज्येष्ठ मंत्र्याने सदर प्रतिनिधीला सांगितला.

भ्रष्टाचारमुक्त कारभार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या दृष्टीनेही अतिशय संवेदनशील विषय आहे हे लक्षात ठेवा. आतापर्यंत राज्यात तसाच कारभार सुरू असल्याचे आपले मत आहे; पण काही विभागांबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी कानावर येत आहेत. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे अमित शहा यांनी मंत्र्यांना बजावल्याची माहिती आहे.

मुंडे घराण्यातील भाऊबंदकी!
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले चुलत बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या संघर्षाचा उल्लेख अमित शहांसमोर केला. या संघर्षावर जनतेच्या साथीने आपण नक्कीच मात करू; पण आपल्याला पक्षीय पातळीवरही त्यासाठी अधिक ताकद मिळाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे पंकजा यांना भाजपाकडून पुरेसे बळ मिळत नाही का, अशी चर्चा पक्षात रंगली आहे.

Web Title: Complaints against the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.