मुंबई- मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कांदिवली पूर्वेकडच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पवई, नाहूर आणि जेव्हीएलआर परिसरात गॅस गळतीचा मोठ्या प्रमाणात वास येत आहे. चेंबूर, चांदिवली आणि विक्रोळी येथील काही भागामधून वायुगळतीच्या तक्रारी आल्या. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथे महापालिकेने पथक रवाना केले.वायुगळती नेमकी कोठून होत आहे आणि कसली होत आहे याचा शोध सुरू असल्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने दिली. दरम्यान, आरसीएफ आणि महानगर गॅस प्रकल्पातून वायुगळती झालेली नाही. तज्ज्ञांचे पथक पाहणी करीत असून रहिवाशांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. रात्री अचानक विचित्र वास वातावरणात भरून गेल्याने पूर्व उपनगरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु अशा कुठल्याही प्रकारची गॅस गळती झालेली नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकारानंतर मुंबईत महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या वेगवेगळ्या टीम गॅस गळतीचा वास येत असलेल्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सर्व पाहणी केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षानं पवई, नाहूर आणि जेव्हीएलआर, मानखुर्द, घाटकोपर परिसरातल्या कोणत्याही पाइपलाइनमधून गॅस गळती होत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतल्या नागरिकांकडून आम्हाला गॅसचा वास येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मुंबईत महापालिकेचं आपत्कालीन नियंत्रण कक्ष त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्यासाठी अग्निशामक दलानंही 9 गाड्या पाठवल्याचं मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षानं सांगितलं आहे.