मुंबई : बेस्टच्या सेवेत असलेल्या एसटीच्या गाड्यांमध्ये लाईट आणि अस्वच्छतेच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. त्यानुसार बेस्टच्या सेवेत एक हजार एसटी बस देण्यात आल्या आहेत.
तर मुंबईत कोरोनादरम्यान ही तात्पुरती एसटीची व्यवस्था आहे आणि परिस्थिती पूर्ववत झाल्यावर काढून घेतली जाऊ शकते. एसटीने दररोज सुमारे ५ लाख जण प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागत नाही, असे एक अधिकारी म्हणाला.
प्रवाशांना घेऊन जातात आणि बसस्टॉपवरील प्रतीक्षा वेळ कमी करतात. बसेस तडकावल्या जात नाहीत, असेही तो अधिकारी म्हणाला.
सामाजिक कार्यकर्ते इरफान माचीवाला यांनी सांगितले, की रात्रीच्या वेळी बसेसची लाईट डीम होते. या गाड्या स्वच्छ नाहीत आणि बाहेरून अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्यापैकी काही गाड्या भंगारात जमा होतील अशा आहेत.
तर एसटीच्या काही गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर धावण्यायोग्य नाहीत. त्यांना भंगारात पाठवावे. प्रवाशांची आर्थिक स्थिती चांगली असून त्यांना त्यादृष्टीने चांगली प्रवास सेवा मिळायला हवी, असे एका प्रवाशाने सांगितले.
सखोल स्वच्छता सुरू
बेस्टच्या सेवेत एक हजार बस देण्यात आल्या आहेत. काही गाड्यांमध्ये लाईटच्या तक्रारी आहेत. तसेच गाड्यांची स्थिती वाईट आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच आता सखोल स्वच्छता सुरू करण्यात आली आहे, असे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.