Join us

वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 6:58 AM

वनमंत्र्यांची बदल्यांना स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वनविभागातील २००हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या या मनमानी पद्धतीने झाल्याची तक्रार सत्ताधारी भाजपच्या आमदारांकडूनच करण्यात आली. आपल्या आमदारांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बदल्यांना तत्काळ स्थगिती दिली आहे. झालेल्या बदल्यांची तपासणी करूनच बदल्या केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांच्याकडून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये शेकडो वनसंरक्षकांबरोबरच, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचाही समावेश होता.   या बदल्यांसंदर्भात अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, ॲड. आशिष जयस्वाल (रामटेक), संदीप धुर्वे (आर्णी) व राम सातपुते (माळशिरस) यांनी आक्षेप घेत वनमंत्री मुनगंटीवार यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी बदली आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली होती. 

याप्रकरणी प्रधान सचिवांच्या दालनात प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांची संयुक्त बैठक पार पडली.

शंका असेल, तर कारवाई होणार : मुनगंटीवार 

बदल्यांसंदर्भातील अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा, असे आदेश मी दिलेले आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत म्हणून मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा.  कुठेही शंका असेल तर कारवाई करा, अशा सूचना दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारजंगलवनविभाग