बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करा - संजीव जयस्वाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:18 PM2023-10-12T20:18:39+5:302023-10-12T20:18:53+5:30
वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास संजीव जयस्वाल यांनी आज भेट देऊन पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुंबई : शासनाचा महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिले. त्याकरिता दुसर्या टप्प्यातील बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास संजीव जयस्वाल यांनी आज भेट देऊन पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तीनही प्रकल्पांतील पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणार्या इमारतींची त्यांनी पाहणी केली. पहिल्या टप्प्यांतील बांधकामाच्या प्रगतीबद्दल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्वसन सदनिकांची उभारणी प्राधान्याने करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले.
स्थानिक भाडेकरू/ रहिवाशांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेविषयी देखील त्यांनी यावेळी माहिती घेतली व पात्रता निश्चितीच्या कामास वेग येण्याकरिता संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषय तडीस नेण्याकरिता योग्य पाठपुरावा करावा, असे त्यांनी याप्रसंगी संबंधित अधिकार्यांना सांगितले. प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या नमूना सदनिकांची देखील त्यांनी पाहणी केली.
- बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता हा प्रकल्प देशातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
- मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथे उभारण्यात येत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुमारे ९२ एकर जागेवर उभारण्यात येत आहे.
- प्रकल्पांतर्गत स्थानिक भाडेकरू /रहिवाशांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे.
वरळी
वरळी येथे ९६८९ पुनर्वसन सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुधारित आराखड्यानुसार टप्पा क्रमांक १ मध्ये पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील ८ विंगचे काम व इमारत क्रमांक ६ मधील ६ पैकी २ विंगचे काम प्रगतीपथावर आहे.
नायगाव
नायगाव येथे ३३४४ पुनर्वसन सदनिकांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यातील ८ पुनर्वसन इमारतींपैकी ५ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
ना. म. जोशी मार्ग
ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत २५६० पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण ७ विंगपैकी ४ विंगच्या बेसमेंटचे काम प्रगतीपथावर आहे.