मुंबई : अंधेरी पोलीस ठाण्यात एका जोडप्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप व्हायरल व्हिडीओद्वारे पोलिसांवर करण्यात आला होता. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आता संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे सुपूर्द केल्याची वार्ता आहे.मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास एका तरुण जोडप्याला अंधेरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ज्याचे चित्रीकरण त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या एका पत्रकाराने केले आणि त्यानंतर तो व्हिडीओ सोशल साइटवर अपलोड केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांनी स्थानिक सहायक पोलीस आयुक्त दिलीप रूपवते यांना दिले होते.चौकशीदरम्यान पाच पोलिसांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ज्यात तीन पोलीस निरीक्षक आणि दोन हवालदार यांचा समावेश आहे, तसेच या जोडप्याचा वैद्यकीय अहवालही पोलिसांना प्राप्त झाला असून, रक्ताच्या नमुन्यांच्या चाचणीत ते दोघे नशेत असल्याचे उघड झाले आहे, असेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तपास पूर्ण, वरिष्ठांकडे अहवाल सादर
By admin | Published: November 06, 2015 2:22 AM