गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने उत्तर मुंबईत सरसकट लॉकडाऊन घोषित केला जाणार असल्याची अफवा पसरली होती. त्यात तथ्य नसून निव्वळ येथील ‘रेड झोन’मध्येच संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विनयकुमार चौबे यांनी शनिवारी स्पष्ट केले. जीवघेण्या आजाराच्या फैलावाची भीती असतानादेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे नियम नागरिकांनी फाट्यावर मारल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.उत्तर मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात ‘रेड झोन’चा समावेश आहे. कंटेनमेंट झोन असल्याचे सांगूनही लोक विनाकारण हातात पिशव्या घेतात आणि सर्वत्र फिरत राहतात ही बाब आमच्या लक्षात आली आहे. त्यामुळे या विभागात संपूर्ण लॉकडाऊन केल्याशिवाय गत्यंतर नाही. दहिसरच्या कोकणीपाडा तसेच काही भागात प्रायोगिक तत्त्वावर आम्ही केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनचा फायदा होत कोरोना रुग्णांची संख्या रोडावली होती. अन्य भागांतही हा प्रयोग राबवत यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे मुंबई उत्तर विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यासाठी पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस बलाचे नऊ गट ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. लोकांना शिस्त नसून रेड झोनमध्ये दुकाने उघडी ठेवत त्या ठिकाणी गर्दी करण्यात येते, फिजिकल डिस्टन्स पाळण्यात येत नाही. परिणामी, त्या ठिकाणी कोरोनाच्या प्रकरणांत वाढ होत आहे.>कठोर निर्बंध लावण्याची तयारी!उत्तर मुंबईच्या विशेषत: झोपडपट्टी परिसरातील रेड झोनमध्ये लोक नियम न पळता घराबाहेर फिरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आम्ही ठरविले. रेड झोनमध्ये रुग्णवाढ झालेल्या अजून काही परिसरांना सहभागी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र अजून कठोर निर्बंध लावण्यात येतील. तसेच पोलीस व एसआरपीएफच्या मदतीने अतिरिक्त बंदोबस्त करण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून अन्य भागांत मात्र स्थिती सामान्य असणार आहे.- विनयकुमार चौबे, मुंबई सहपोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था>येथे होणार ‘लॉकडाऊन’!दहिसर येथील केतकीपाडा, काजूपाडा, कांदिवलीच्या समतानगर पोलिसांच्या हद्दीतील नऊ कंटेनमेंट झोन, दहिसर येथील गणपत पाटील नगरसह अजून काही भागांत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीच दुकाने अथवा आस्थापने उघडण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी नियम न मोडण्याची काळजी घ्यावी.
CoronaVirus News : उत्तर मुंबईच्या ‘रेड झोन’मध्ये होणार संपूर्ण लॉकडाऊन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 1:19 AM