Join us  

विजेसंदर्भातील देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करा

By admin | Published: May 11, 2016 2:25 AM

पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळवाऱ्यामुळे शिवाय अतिवृष्टीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर वीज यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे

मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळवाऱ्यामुळे शिवाय अतिवृष्टीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर वीज यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देऊन सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.ज्या परिसरांत वरून जाणाऱ्या वीजवाहिन्या आहेत. तेथे आजूबाजूला वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या वीजतारांवर लोंबळकत असतात. अशा फाद्यांबाबत आवश्यक ती परवानगी घेऊन त्या छाटून टाकाव्यात. काही कारणांमुळे दोन खाबांमधील तारांना झोल पडून जमिनीपासूनचे अंतर कमी होते. अशावेळी या तारा ओढून घेणे गरजेचे आहे. खाबांचे ताण आणि त्यांचे ताण सुस्थितीत आहेत की नाही? हेदेखील तपासून पाहणे गरजेचे आहे.उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील तेल योग्य पातळीत आहे ना; याची खात्री करून घ्यावी. तेलाची पातळी कमी असल्यास ते योग्य पातळीपर्यंत भरून घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे अर्थिंग हा एक महत्त्वाचा घटक असून, ट्रान्सफॉर्मरसंदर्भातील अर्थिंग पावसाळ्यापूर्वी मजबूत करून घेणे गरजेचे आहे. विजेचे खांंब, वीज वितरण जोडण्या या सर्वांचे अर्थिंग व्यवस्थित आहे की नाही? हेदेखील तपासून घ्यावे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी किमान साहित्य आपल्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी हे साहित्य आपल्याकडे असल्याची खातरजमा करून घ्यावी; अशा सूचना सतीश करपे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)