मुंबई : मेट्रोच्या रखडलेल्या कामांवरून नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ मेट्रोची कामे सुरू असण्यावरून एमएमआरडीएला नेहमीच सामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर कडक उपाय आखण्यासाठी एमएमआरडीएचे नवनियुक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटदारांचा क्लास घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मेट्रोच्या ज्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून दिरंगाई होत आहे, अशा कंत्राटदारांना आपला हिसका दाखविण्यास सुरुवात केली आहे. ज्याची सुरुवात त्यांनी सोमवारी मेट्रो-७ प्रकल्पापासून केली.अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या पट्ट्यात मेट्रो-७च्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आर. राजीव यांनी आढावा दौरा आयोजित केला होता. ‘जर तुम्हाला सर्व सुविधा वेळेवर आणि मुबलक प्रमाणात मिळत असतील, तर कामगारांच्या सुरक्षिततेमध्ये, कामाच्या दर्जात, कोणतीही तडजोड यापुढे स्वीकारली जाणार नाही,’ असा इशारा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिला.यापुढे दर १५ दिवसांनी कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, तसेच पुढच्या १५ दिवसांत संपूर्ण मेट्रो मार्गावरील बांधकामाच्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा आणि मार्गावरील नाल्यातील गाळ काढण्याचेआदेशही त्यांनी या वेळी अधिकाºयांना दिले. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)या मेट्रो-७ मार्गावरील नाला स्वच्छतेचे ५० टक्के काम आत्तापर्यंत पूर्ण झाल्याची माहिती आर. ए. राजीव यांनी या वेळी दिली.
मेट्रोचे काम वेळेतच पूर्ण करा; आयुक्तांनी भरला दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:25 AM