‘पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई’ वेळेत पूर्ण करा, विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:00 AM2020-12-25T01:00:08+5:302020-12-25T01:00:23+5:30
Uddhav Thackeray : घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा या वेळी घेण्यात आला. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई : नवी मुंबईतील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आढावा घेतला. पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देववन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यांसारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा या वेळी घेण्यात आला. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कांदळवन सुरक्षित ठेवून विकासाबाबत पुढे जाता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा. तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर २०मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करावे. गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा झाली. यासंदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत या वेळी चर्चा झाली. नवी मुंबईतील १३ रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खा. राजन विचारे यांनी केली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.
घणसोलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल !
घणसोली येथे राखीव भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बांधण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत तांत्रिक बाजू पूर्ण करून महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.