पदभरतीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:47 AM2021-01-01T00:47:38+5:302021-01-01T06:59:12+5:30

जनआरोग्य योजनेवरही भर

Complete the recruitment process in a month; Health Minister Rajesh Tope's instructions | पदभरतीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

पदभरतीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  

विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा  दर्जा उंचावण्याचे आवाहन केले.

कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून, आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरू करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  

राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, जिल्हा यंत्रणेने सार्वजनिक आरोग्य संस्थेतील स्वच्छता, परिसर स्वच्छता, भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलण्याचे काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ

आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा मानस असून, त्यासाठी तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांचा अभ्यास करावा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Complete the recruitment process in a month; Health Minister Rajesh Tope's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.