Join us  

सोलापूर रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार सदनिकांच्या उभारणीचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा  

By सचिन लुंगसे | Published: July 03, 2023 7:29 PM

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचे आढावा बैठकीत संबंधितांना निर्देश

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ३० हजार असंघटित श्रमिक कामगारांकरिता सोलापूरमधील रे नगर येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज घेतला व पहिल्या टप्प्यातील १५ हजार सदनिकांच्या उभारणीचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यन्त पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सदनिकांच्या उभारणीचे काम मार्च २०२६ ऐवजी डिसेंबर २०२४ पर्यन्त पूर्ण करण्याबाबतचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना संजीव जयस्वाल यांनी या बैठकीत दिले. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या सदनिकांचे वाटप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे अशी माहिती  माजी आमदार नरसैया आडम यांनी दिली.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या बैठकीला माजी आमदार नरसैया आडम, केंद्रीय गृहनिर्माण व दारिद्र्य निर्मूलन विभागाचे उपसचिव एस. के. बब्बर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), म्हाडाचे मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, शिवकुमार आडे, कार्यकारी अभियंता वैभव केदारे, रे नगर फेडरेशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी त्यांनी यावेळी श्री. आडम, प्रकल्प विकासक आणि रे नगर फेडेरेशनच्या सभासदांकडून जाणून घेतल्या.

राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पांच्या समन्वयासाठी म्हाडा सुकाणू अभिकरण म्हणून काम पाहते व प्रधानमंत्री आवास योजनांचे राज्यस्तरावर नियंत्रण करण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हे राज्य अभियान संचलनालयाच्या अभियान संचालकपदी नियुक्त आहेत.                 

या प्रकल्पाचे लाभार्थी हे असंघटित कामगार असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन कर्ज वितरणाबाबत काही अटी व शर्ती शिथिल करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून पाठपुरावा करण्याबाबत श्री. बब्बर यांना सांगितले. त्याचबरोबर प्रकल्प ठिकाणी पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची जोडणी, सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा या सुविधांच्या उभारणीकरिता येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले.             

आडम यांनी स्थानिक शाळेबाबत प्रश्न उपस्थित केला असता श्री. जयस्वाल यांनी शाळेची इमारत उभारणीस वेळ लागत असल्यास तात्पुरत्या स्वरुपातील इमारतीची उभारणी करण्याचे निर्देश दिले. तसेच श्री. आडम यांनी प्रकल्प स्थळी पोहचण्याकरिता रस्ता उभारण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याबाबत श्री. जयस्वाल म्हणाले की, याकामी राज्य सरकारकडून अर्थसाह्य मिळते का याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले.

जयस्वाल पुढे म्हणाले की, रे नगर येथे उभारण्यात येणार्याू प्रकल्पाची व्याप्ती पाहता हा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत तयार होणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. करिता कुंभारी ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा प्राप्त करून घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले. तसेच वनीकरण विभागाच्या सहाय्याने प्रकल्पस्थळी झाडे लावून सदर प्रकल्प पर्यावरण पूरक करण्याबाबत प्रयत्नशील राहण्याबाबतही त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा दर १५ दिवसांनी सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी, प्रकल्प विकासक तथा म्हाडा अधिकारी यांना दिले.

टॅग्स :म्हाडासोलापूर