Mumbai: मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करा,आमदार भारती लव्हेकर यांनी वेधले लक्ष
By मनोहर कुंभेजकर | Published: August 1, 2023 06:09 PM2023-08-01T18:09:10+5:302023-08-01T18:09:55+5:30
Bharti Lovekar : मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन अनेक वर्षे प्रलंबित आहे.मुंबई शहर आणि उपनगरात ४१ कोळीवाडे असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन मंद गतीने सुरू आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन अनेक वर्षे प्रलंबित आहे.मुंबई शहर आणि उपनगरात ४१ कोळीवाडे असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन मंद गतीने सुरू आहे.
त्यामुळे सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन लवकर पूर्ण करून व नवीन डी.सी.आर. तयार करून त्याचा २०३४ च्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात यावा.वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे सदर मागणी केली. लोकमतने याबाबत सातत्याने वृत्त देवून शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.
आपल्या मतदार संघातील वेसावे कोळीवाड्यात कोळी बांधवांनी जर घरांची दुरुस्ती डागडुजी केली तर पालिका प्रशासन परवानगी देत नाही,त्यावर तोडक कारवाई करते.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ साली वर्सोवा महोत्सवात मुंबईतील कोळीवाड्यांसाठी नवीन डी.सी.आर. तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासा संदर्भात नवीन डी.सी.आर काढून त्यांचे लवकरात लवकर सीमांकान पूर्ण करावे अशी मागणी करत आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डी.सी.आर. कधी तयार होणार याकडे कोळी बांधवांचे लक्ष लागले आहे.