दिंडोशीतील नाले व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा; सुनील प्रभू यांची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: May 26, 2024 06:36 PM2024-05-26T18:36:38+5:302024-05-26T18:38:09+5:30
दिंडोशी विधानसभा क्षेत्र हे बहुतांशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उतारावर वसलेले आहे.
मुंबई- पावसाळा तोंडावर आला असतांना लोकसभा रणधुमाळीत दिंडोशी विधानसभा क्षेत्रात नालेसफाई रखडलेली असून रस्त्यांची कामे अर्धवट आहे. दिंडोशीत 17 मोठे नाले असून 25 छोटे नाले आहेत.तर 10 ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे आणि नालेसफाई तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी उद्धव सेनेचे नेते व दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी पालिका परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार व पालिका उपायुक्त -पायाभूत सुविधा उल्हास महाले यांच्या कडे केली आहे.
दिंडोशी विधानसभा क्षेत्र हे बहुतांशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उतारावर वसलेले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत येथील नागरी वस्तीत मोठे दगड, माती, कचरा वाहून येतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होवून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. तर काही वेळा घरे देखिल वाहून जातात. शिवाय रोगराई पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.याबाबत पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सदर कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा
दिंडोशीत सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून यातील अनेक कामे अर्धवट आहेत.यामुळे पावसाळ्यात येथे पाणी तुंबण्याचा धोका आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वी दिंडोशीतील रस्ते समतोल करून सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे वेगात पूर्ण करा अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रांन्वये केली आहे.या कामांसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.