पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. सरकारमध्ये पूर्ण एकवाक्यता आहे. तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत, असे सांगत विरोधकांनी अशा संकट काळात टीका-टिप्पणी करु नये, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत मंगळवारी त्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पवार यांना या वयात मातोश्रीवर हेलपाटे मारावे लागत आहेत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिप्पणीवर पवार म्हणाले, त्यांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. पण तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. सध्या ज्या मुलाखतीची चर्चा आहे, ती देण्यासाठी मी गेलो होतो. तेथून फर्लांग अंतरावर मातोश्री निवासस्थान होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी १४ किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही. राज्यात विविध प्रश्न आहेत. त्याबाबत मी सातत्याने मुख्यमंत्र्यांशी बोलत असतो.मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या आरोपांवर पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या प्रमुख लोकांनी बाहेर पडणे योग्य नाही. ते बाहेर गेल्यास गर्दी होते आणि या आजारात नेमके तेच टाळण्याची गरज आहे. सध्या कम्युनिकेशनची अनेक साधने आहेत. त्याचा वापर केला जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का? या प्रश्नावर, जे दिसतेय ते निश्चितच समाधानकारक आहे. कोरोनाबाबतीत युद्धपातळीवर काम सुरू आहे, असे ते म्हणाले.दररोज प्रमुख मंडळी १४-१५ तास काम करीत आहे. मी हे सारे जवळून पाहतोय. सारथी संस्थेबाबत सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता, यावर आपणास काही माहिती नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत पूर्ण एकवाक्यता - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:52 AM