लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ बसली. त्यात आता येत्या काही आठवड्यांमध्ये तिसरी लाट धडकणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तिसऱ्या लाटेत बांधकाम क्षेत्राचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील मजूर व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेऊन, त्यांच्या लसीकरणासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे. यासाठी बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांनी सरकारला पत्रदेखील लिहिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. या वर्षाच्या एप्रिलपासून नवे प्रकल्प बाजारात येण्यात व घर विक्रीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. देशातील विविध राज्यांत लॉकडाऊनमुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत कामगारांची कमतरता, आर्थिक अडचणी, प्रकल्प मंजुरीस विलंब, कच्च्या मालाच्या किमतींत वाढ तसेच बाजारातील अनिश्चितता या सर्वांचा सामना बांधकाम क्षेत्राला करावा लागत आहे. हेच लक्षात घेता तिसऱ्या लाटेत बांधकाम क्षेत्राने तग धरावा यासाठी बांधकाम मजुरांचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक मोहनानी यांनी सांगितले की, लसीकरणाच्या प्रक्रियेने वेग पकडल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ शकतो. यासाठीच बांधकाम क्षेत्रातील कामगारांना स्लॉट मिळावेत यासाठी आम्ही शासनाला पत्र लिहिले आहे.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ प्रीतम चिवूकुला यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रातील मजूर व कर्मचारी हे शहरांचा खऱ्या अर्थाने विकास करतात. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास देशातील बांधकाम उपक्रम सुरळीत चालू राहतील. त्याचप्रमाणे लोकांच्या स्वप्नातील घरे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.