Join us

मुंबईतील ३८ लाख ७९ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 8:08 AM

पालिकेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांकडून पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून मुंबई महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांनी ३८ लाख ७९ हजार घरांचा सर्व्हे केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवारी दिली. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई  महापालिका क्षेत्रात  २३ जानेवारीपासून महापालिका हद्दीत मराठा तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. नुकतेच हे सर्वेक्षण पूर्ण झाले. महापालिका क्षेत्रातील ३८ लाख ७९ हजार ४६ इतक्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ३० हजार  कर्मचारी कार्यरत होते. १ फेब्रुवारी रोजी मराठा तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’ने  कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण दिले होते.

     सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते.  सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ प्रश्न असून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. 

     ही माहिती मूलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेण्यात आली नाही. ही कार्यवाही उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या  देखरेखीखाली  करण्यात आली. 

टॅग्स :मुंबईमराठा आरक्षण