मुंबई : एमएमआरसीच्या पॅकेज-७ अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे बेस स्लॅबचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून एकूण ३०९ वर्गमीटरच्या या बेस स्लॅबसाठी ८३ मेट्रिक टन स्टील आणि ५५२ घनमीटर इतक्या काँक्रिटचा वापर करण्यात आला असल्याचे एमएमआरसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.मेट्रो-३ भुयारीकरणाचे काम सात टप्प्यांमध्ये सुरू आहे. भुयारीकरणासोबत आतील भागांत सिमेंटचे अस्तर बसवणे, स्लॅब टाकणे अशी कामे सुरू आहेत. भुयारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रूळ टाकणे, वीजपुरवठ्याच्या लाइन टाकणे सिग्नल यंत्रणा उभारणे अशा महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. मेट्रो- ३ प्रकल्पामध्ये एकूण ५२.२१ किमी लांबीचा बोगदा करण्यात येणार आहे. यापैकी २५ मीटरचा बोगदा पूर्ण करण्यात आला आहे. सध्या सात पॅकेजमध्ये काम सुरू आहे. यामध्ये कफ परेड ते सीएसटी मेट्रो स्थानक या पहिल्या पॅकेजमध्ये ५ हजार ८९४ मीटरचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. यापैकी २ हजार २०७ मीटरचा बोगदा पूर्ण करण्यात आला आहे. सीएसटी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल या दुसºया पॅकेजमध्ये ४ हजार ५६१, मुंबई सेंट्रल ते वरळी या तिसºया पॅकेजमध्ये ८८१ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर वरळी ते धारावी या चौथ्या पॅकेजमध्ये ६ हजार २६७ मीटर, धारावी ते आग्रीपाडा या पाचव्या पॅकेजमध्ये ४ हजार ८१८ मीटर, आग्रीपाडा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ या सहाव्या पॅकेजमध्ये २ हजार १६७ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सारीपुतनगर या सातव्या टप्प्यामध्ये ३ हजार ७१५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे.
मेट्रो-३ मार्गिकेतील एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे बेस स्लॅबचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:21 AM