मुंबई- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत मुंबई मेट्रो लाईन ३च्या सातव्या पॅकेजमधील सीप्झ स्थानकावर भुयारीकरणाचा दुसरा टप्पा संपन्न झाला आहे. वैनगंगा २ या टनेल बोअरिंग मशीनने २३ ऑगस्ट २०१७ रोजी सारीपुत नगर लाँचिंग शाफ्ट येथून आपले काम सुरू केले. ५६८ मीटर इतके भुयारीकरण अवघ्या १२५ दिवसांत २५० पेक्षा अधिक अभियंता आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने संपन्न झाले. भुयारीकरणाचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार करून मेट्रो ३ मार्गिकेच्या इतिहासात याची नोंद सोनेरी अक्षराने केली जाईल.वैनगंगा २ या टीबीएमची रचना भूगर्भातील कठीण खडक जसे की बेसाल्ट, टफ यांना भेदून भुयारीकरण करण्यासाठी केलेली आहे. ९२ मीटर इतक्या मीटर लांबीच्या वैनगंगा २ प्रतिदिन १० ते १३ मीटर इतके भुयार तयार करते. हे भुयार एकूण ४०५ आरसीसी सिमेंटने तयार केलेले आहे. भविष्यात मुंबई मेट्रो ३ मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, आरे कॉलनी त्याचप्रमाणे वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर मेट्रो १ मार्गिका , आणि स्वामी समर्थ नगर- जोगेश्वरी- कांजुरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ मार्गिका व सीप्झ , एमआयडीसी सारख्या व्यावसायिक क्षेत्राला जोडली जाणार आहे. एमएमआरसीने आतापर्यंत १५ किलोमीटर इतके भुयारीकरण पूर्ण केले आहे, यासाठी एकूण १० टीबीएम शाफ्टमधून तब्बल १७ टीबीएम मशीन कार्यरत आहेत. या प्रसंगी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या," मुंबई मेट्रो ३च्या भुयारीकरणाचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार करून हे अभूतपूर्व यश प्राप्त झाली, यासाठी मी आमच्या सर्व अभियंता व कर्मचारीवर्गाचे मनापासून अभिनंदन करते. या प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले प्रत्येकाच्या अथक परिश्रमामुळे भुयाराचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यास आपल्याला यश प्राप्त झाले आहे. एल अँड टी आणि शांघाय टनेल इंजिनीअरिंग हे पॅकेज ७ एमआयडीसीमार्गे मरोळ नाका ते सीप्झ या स्थानकांमधील भुयारीकरणाचे काम करते. या पॅकेजमधील एकूण भुयाराची लांबी ७.७ किमी असून या भुयारीकरणातून एकूण ११ लाख क्यूबिक मीटर इतकी माती उत्खनित होणार आहे. ही माती तळवाई-पिसे येथील शासनाने दिलेल्या जागेवर टाकली जाईल. आतापर्यंत एकूण ४.२ क्युबिक मीटर इतकी माती बाहेर टाकली गेली आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिका, सीप्झ मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा दुसरा टप्पा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:17 PM