टास्क पूर्ण करणे बँक कर्मचाऱ्याला पडले महागात; साडेचार लाखांची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:24 PM2023-06-07T12:24:50+5:302023-06-07T12:27:05+5:30
शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली दादरमधील बँक कर्मचाऱ्याची साडेचार लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे एका खासगी बँकेत नोकरीला आहेत. ३ जून रोजी त्याला मॅराथॉन डिजिटल होल्डिंग्ज आणि ॲमेझॉन इंडियामध्ये नोकर भरती सुरू असून तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता, असा मोबाइलवर संदेश आला. याच संदेशाला बळी पडून संपर्क साधताच, आरोपीने त्यांना टास्क पूर्ण करण्याचे काम दिले. ॲमेझॉन कंपनीचा ट्रान्झॅक्शन रेट वाढविण्यासाठी ॲमेझॉन शॉपिंग साइटवर जाऊन प्रोडक्ट कार्टमध्ये टाकायचे आहेत, असे सांगण्यात आले.
ठगांनी सांगितल्याप्रमाणे ते कार्टमध्ये प्रोडक्ट टाकत होते. पुढे त्याला एक टेलिग्रामची लिंक पाठवून एका ग्रुपमध्ये ॲड केले गेले. त्यानंतर तरुणाला एका यूपीआय आयडीवर सहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्याने ही रक्कम पाठवताच काही वेळातच त्याच्या खात्यात सहा हजार ७६० रुपये जमा झाले.
पैसे खात्यात जमा होत असल्याने तो पैसे जमा करत गेला. पुढे आणखी दोन लाख ९७ हजारांची मागणी होताच त्याला संशय आला. त्याने व्यवहार थांबवले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने शिवाजी पार्क पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.