मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजांतील प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडून आश्वासनाखेरीज काहीही दिलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात प्राध्यापकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला असून, मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळच्या सत्रांवर प्राध्यापक बंदचा फारसा परिणाम शहरात दिसून आला नाही. एमफुक्टो संघटनेने बंदचे शस्त्र उगारले असले तरी मुक्ता संघटना, प्रहार आणि नेट सेट धारकांच्या संघटनेने या बंदमध्ये सामील न होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्राध्यापकांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुक्ता संघटनेचे वैभव नरवडे यांनी दिली.
कीर्ती कॉलेजमधील ९९ टक्के प्राध्यापक कामावर असून काही कार्यालयीन अधिकारी संपावर असल्याची माहिती मिळाली आहे. बुक्टू संघटनेचे काही अधिकारी यांनी काम बंद ठेवले असून पालघर येथील दांडेकर कॉलेजमधील सर्व प्राध्यापक कामावर असल्याची माहिती मिळत आहे. सायन येथील के. जे. सोमैया कॉलेज, देवरुख येथील एएससपी कॉलेज ही नियमित सुरू आहे. तेथील प्राध्यापकांची उपस्थिती १०० टक्के आहे.
प्रत्येक वेळेस सामूहिक रजा, बेमुदत आंदोलन, परीक्षा बहिष्कार अशा आत्मघातकी प्रकाराला शिक्षकांनी बळी पडून आपलेच नुकसान करू नये, विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. बेमुदत आंदोलन हा शेवटचा पर्याय असतो. शिक्षकांनी कोणत्याही प्रकाराला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन देखील मुक्ता संघटनेने सर्व शिक्षकांना संघटनेने केल्याने हे आंदोलन कितपत यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वांद्रे येथील चेतना कॉलेज, नांदेडचे यशवंत, प्रतिभा निकेतन आणि एन. एस. बी कॉलेज पूर्णपणे व सुरळीत चालू असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याचे फर्ग्युसन कॉलेजही पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर, प्रगती कॉलेज यावर प्राध्यापक बंदचा काहीही परिणाम झाला नसल्याची माहिती प्राध्यापक संघटनांनी दिली आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज दुपारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यासाठी प्रमुख संघटनांना बोलाविण्यात आले आहे. तरी बुक्टू आणि एमफुक्टोमधील सदस्य आपले काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मधू परांजपे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.