‘स्वराज्य भूमी’वर संमिश्र प्रतिक्रिया

By Admin | Published: March 20, 2015 12:42 AM2015-03-20T00:42:07+5:302015-03-20T00:42:07+5:30

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर गिरगाव चौपाटीवर १९२०मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्मारकदेखील आहे.

Composite response on 'Swarajya Bhoomi' | ‘स्वराज्य भूमी’वर संमिश्र प्रतिक्रिया

‘स्वराज्य भूमी’वर संमिश्र प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर गिरगाव चौपाटीवर १९२०मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्मारकदेखील आहे. या ठिकाणाचे नामकरण ‘स्वराज्य भूमी’ करावे, अशी मागणी होत होती. अखेर तरुण पिढीला त्यांच्या योगदानाविषयी माहिती मिळावी, त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळावी यासाठी गिरगाव चौपाटीवरील अंत्यसंस्कार झालेल्या जागेचे ‘स्वराज्य भूमी’ असे नामकरण करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
गिरगाव चौपाटीचे नामकरण स्वराज्य भूमी करणे, हा निर्णय म्हणजे उशिरा का होईना, योग्य निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या. तर ती चौपाटी आहे, भूमी कसे म्हणणार, असा सवालही काहींनी उपस्थित केला.
‘स्वराज्य’ संकल्पनेचा सरकारने फार उदोउदो करण्याची आवश्यकता नाही. स्वराज्य ही गुलामगिरीची निशाणी असल्याचे परखड मत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ब्रिटिश भारतावर राज्य करीत होते. तेव्हा स्वराज्य म्हणजे देशातील अंतर्गत अधिकार मागितले गेले. १९४२ साली कुठल्याही राजकीय पक्षांनी स्वातंत्र्य नाही, स्वराज्य मागितले होते. साम्राज्यवाद राहावा पण, अंतर्गत राज्य करायला मिळावे, यासाठी ही मागणी केली होती, हा इतिहास आहे. लोकमान्यांचे कार्य खूप मोठे आहे.
माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गिरगाव चौपाटीचे ‘स्वराज्य भूमी’ असे नामकरण करावे, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मी केली होती. पण त्या वेळी ही मागणी मान्य झाली नाही. लोकमान्यांचे मुंबईवर प्रेम होते. त्यांनी मुंबईत पहिला गणेशोत्सव साजरा केला. यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे राऊत यांनी सांगितले.
कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी म्हणाले की, या नामकरणाला अर्थ काय? गिरगाव ‘चौपाटी’ आहे, ती ‘भूमी’ कशी होऊ शकेल? लोक त्या परिसराला ‘गिरगाव चौपाटी’ असेच म्हणणार. नवे नाव रुळणार नसेल, तर हा खटाटोप कशाला, असा सवालही रेड्डी यांनी उपस्थित केला.

स्वागतार्ह निर्णय
स्वराज्य भूमी असे नामकरण केलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या ठिकाणाला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. तरुणांना लोकमान्य टिळकांविषयी अजून माहिती मिळावी, यासाठी तिथे चांगले उपक्रम राबवावेत.
- नवाब मलिक, प्रवक्ते : राष्ट्रवादी काँग्रेस
योग्य निर्णय
स्वराज्य भूमी असे नामकरण करण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. तिथे लोकमान्य टिळकांचे स्मारक आहे. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त होईल.
- प्रदीप मादुस्कर, ज्येष्ठ मूर्तिकार

अत्यंत चांगला निर्णय
लोकमान्य टिळकांचे अंत्यसंस्कार गिरगाव चौपाटीवर झाले. या ठिकाणाला स्वराज्य भूमी असे नाव दिले, हा अत्यंत चांगला निर्णय आहे. या ठिकाणी टिळकांविषयी तरुणांना माहिती मिळेल अशा पद्धतीने उभारणी व्हायला हवी.
- पराग वेदक, गिरगाव
परिसरात अजूनही अनेक समस्या
गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळकांवर अंत्यसंस्कार झाले. त्या ठिकाणाला स्वराज्य भूमी असे नाव देणे हा निर्णय चांगला आहे. पण परिसरामध्ये अजूनही अनेक समस्या आहेत. त्याकडेही स्थानिक आमदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - पांडुरंग सकपाळ, विभागाध्यक्ष : शिवसेना

निर्णयाला उशीर
हा निर्णय खूपच उशिरा घेतला गेला. याआधीच नामकरण व्हायला पाहिजे होते. पण पूर्वी हे झाले नाही. आता घेतलेला निर्णय चांगला आहे.
- अरुण दुधवडकर, नेते : शिवसेना

Web Title: Composite response on 'Swarajya Bhoomi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.