ठाणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:07 AM2021-04-08T04:07:10+5:302021-04-08T04:07:10+5:30
ठाणे : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ठाणे जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी करण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु, बुधवारी संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून ...
ठाणे : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ठाणे जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी करण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु, बुधवारी संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. बुधवारी ठाणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार बंद होते. तर इंदिरानगर भागात व्यापाऱ्यांनी हाताला निषेधाच्या काळ्या पट्टय़ा बांधून शासनाचा निषेध केला. मुंब्य्रातील गुलाब पार्कमधील व्यापाऱ्यांनी ही रस्त्यावरून आंदोलन केले. अंबरनाथमध्ये गुरुवारी आंदोलन करण्यात येणार असून, कल्याण - डोंबिवलीत मंगळवारी आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
निदर्शने केल्याप्रकरणी नवी मुंबईत गुन्हे दाखल
नवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांना व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून नवी मुंबईत व्यापारी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहेत. नियम डावलून हे आंदोलन होत असल्याने वाशी व एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पनवेलमध्ये काळे कपडे परिधान करून लॉकडाऊनचा निषेध
पनवेल : शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापारी दुकानदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बुधवारी खारघरमधील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या विरोधात उत्सव चौकात मानवी साखळी तयार करून काळे कपडे परिधान करून लॉकडाऊनचा निषेध केला.
पालघरमधील व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट
पालघर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांचा फटका व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांना बसत आहे. नालासोपारा, वसई, विरार, नायगाव परिसरातील व्यापारी संघटना, दुकानदारांनी विरोध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी संतप्त व्यापारी, दुकानदारांनी नालासोपाऱ्यात रास्ता रोको, विरार येथे पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू झालेली आहे. त्याचा फटका बसत असलेल्या व्यापारी - दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच्या लाॅकडाऊनमध्ये कंबरडे मोडलेले असल्याने पुन्हा लाॅकडाऊनचे नियम कडक केल्याने व्यापाऱ्यांनी आपली कुटुंबे, नोकरचाकरांचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल उपस्थित केला आहे.