Join us

वाहतूकदारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:07 AM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किमती, वस्तू सेवा कर, तसेच सरकारने ई-वे संदर्भात आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदारांनी शुक्रवारी ...

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किमती, वस्तू सेवा कर, तसेच सरकारने ई-वे संदर्भात आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदारांनी शुक्रवारी बंद पाळला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

भारतभरातील व्यापार व्यवसायासाठी काम करणाऱ्या संघटना तसेच कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला होता. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन संस्थेसह काही वाहतूक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजीपाला आणि इतर वाहतुकीवर संपाचा फारसा परिणाम झाला नाही.

ऑल इंडिया ट्रान्सपार्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र आर्य म्हणाले की, वस्तू सेवा कराच्या स्वरुपात काही मूलभूत बदल करण्यात यावेत तसेच इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारने त्यावर ठोस पावले उचलावीत. मुदत संपलेल्या ई बिलाला घेऊन जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या चालकांना ठोठावल्या जाणाऱ्या दंडात नव्या कायद्यानुसार वाढ करण्यात आल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. २०१७ या वर्षात वस्तू सेवा कराच्या स्वरूपात ही तरतूद करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून खासगी वाहतूक करणाऱ्या चालकांना व वाहनांवर भुर्दंड पडणार आहे. आज आम्ही चर्चगेट, माझगाव, बेलापूर येथे जीएसटी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून आमचे निवेदन दिले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाबाहेर मास्क वाटप करण्यात आले. यावेळी बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश खोसला, ऑल इंडिया ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अभिषेक गुप्ता उपस्थित होते, असे ते म्हणाले.