मुंबई :-
मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली.
मुंबईतील अनेक पोलीस वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यात राहणारे पोलिसांचे कुटूंबीय जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली तसेच पोलीस कुटूंबियांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली.
यावेळी बोलताना पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल तसेच पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.