Join us

महारेरा सलोखा मंचातील समझौता करार विकासकांवर बंधनकारक; अजोय मेहता यांचा महत्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2022 4:59 PM

रेरा कायद्यातील कलम ३२नुसार मुंबई ग्राहक पंचायतीने प्रस्तावित केलेले महारेरा सलोखा मंच गेली चार वर्षे कार्यान्वित आहेत.

मुंबई- महारेरा सलोखा मंचात ग्राहक आणि विकासकाने केलेल्या समझौता कराराला  कायदेशीर अधिष्ठान असल्यामुळे अशा समझौता कराराचा विकासकाने भंग केला  तर रेरा कायद्याच्या कलम ६३ नुसार तो दंडनीय अपराध ठरतो असा महत्त्वपूर्ण निर्णय महारेरा अध्यक्ष अजोय मेहता यांनी नुकताच दिला आहे.

रेरा कायद्यातील कलम ३२नुसार मुंबई ग्राहक पंचायतीने प्रस्तावित केलेले महारेरा सलोखा मंच गेली चार वर्षे कार्यान्वित आहेत. या सलोखा मंचांत मुंबई ग्राहक पंचायतीचा एक आणि विकासकांच्या संस्थेचा एक, असे दोन प्रतिनिधी असतात. रेरा कायद्यातील प्रस्थापित तक्रार निवारण व्यवस्थेला पर्यायी अशी सोपी, जलदगतीने आणि परस्पर सामंजस्याने तंटा निवारण करणारी ही   सलोखा मंचाची व्यवस्था आहे. या सलोखा मंचात तक्रारदार आणि विकासक वा त्याचा अधिकृत प्रतिनिधी सलोखा मंचाच्या प्रशिक्षित आणि अनुभवी सलोखाकारांच्या सहाय्याने आपल्या तंट्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे सामंजस्याने तंटा निवारण होते,त्यावेळी तक्रारदार ग्राहक आणि विकासक यांच्यात समझौता करार होतो अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला दिली.

सलोखा मंचाद्वारे तक्रार निवारण ही सोप्या आणि जलदगतीने ग्राहकांच्या हितासाठी राबवायची कायदेशीर तक्रार निवारण व्यवस्था असल्याचे नमूद करुन सलोखा मंचाला असलेले कायदेशीर अधिष्ठान लक्षात घेता त्यात केलेला समझौता करार हा महारेराचाच आदेश म्हणून पाळला गेला पाहिजे असेही महारेरा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. त्याहीपुढे जाऊन महारेरा अध्यक्षांनी समझौता करार धाब्यावर बसवणार्या अन्य विकासकांनाही स्पष्ट इशारा दिला असून भविष्यात अशा समझौता करार ऊल्लंघनाच्या तक्रारी आल्यास हा गंभीर गुन्हा असल्याने महारेरा त्याची गंभीर दखल घेऊन भविष्यातही अशा विकासकांना दंड ठोठावल्याशिवाय राहणार नाही असे बजावले आहे. 

सलोखा मंचाला बळकटी देणाऱ्या महारेरा अध्यक्षांच्या या पथदर्शी  निर्णयाचे मुंबई ग्राहक पंचायत मनापासून स्वागत करत असून सलोखा मंचात सादर करण्यात येणारा समझौता करार विकासक यापुढे तरी गांभीर्याने घेतील अशी आशा मुंबई ग्राहक पंचायतीला आहे असे अँड.शिरीष देशपांडे म्हणाले. तसेच या निर्णयामुळे भविष्यात जास्तीत जास्त तक्रारदार महारेरा सलोखा मंचाचा वापर करून जलदगतीने आपल्या तक्रारींचे निवारण करुन घेतील असा विश्वासही मुंबई ग्राहक पंचायतीने व्यक्त केला.

सलोखा मंचापुढे असा समझौता करार करुन सुद्धा काही विकासक या कराराचे पालन न करुन किंवा कराराचा भंग करुन ग्राहकांना नाडताना आढळतात. अशाच एका प्रकरणात प्रकाश शिंदे या ग्राहकाने आदित्य एंटरप्राईझ या विकासकाविरुद्ध सलोखा मंचात केलेल्या समझौता कराराचा भंग केल्याबद्दल आणि त्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी महारेरा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महारेरा अध्यक्षांनी सलोखा मंचाचे कायदेशीर अधिष्ठान अधोरेखीत करत समझौता कराराचे ३० दिवसांत पालन करण्याचा आदेश देऊन तसे न‌ केल्यास विकासकाला दर दिवशी ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर सलोखा मंचापुढे केलेले समझौता करार हे दोन्ही पक्षांवर बंधनकारक असल्याचे नमूद करत अशा कराराची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ वा भंग केल्याची तक्रार महारेरा प्राधिकरणाकडे आल्यास त्याची दखल घेणे हे प्राधिकरणावरही बंधनकारक असल्याचे महारेरा अध्यक्षांनी या निर्णयात स्पष्ट केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई