मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात, एखाद्या अभ्यासक्रमाचे शुल्क किती आहे, प्रवेश क्षमता किती आहे, त्या महाविद्यालयात कोणत्या पायाभूत सुविधा आहेत या अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांची माहिती आता सर्वांना एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक परिक्षणासाठी विद्यापीठाने माहितीचे ॲानलाईन संकलन केले आहे. सुमारे ४०० हून अधिक महाविद्यालय आणि संस्थांनी माहिती भरली असून ही माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचे अध्ययन-अध्यापन, कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानात्मक करण्याची तरतूद आहे. तसेच व्यवस्थापनाची व्यवहार्यता आणि वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे महाविद्यालयांच्या, विद्याशाखांच्या आणि विषयाच्या शैक्षणिक कामगिरीची मानके लक्षात घेता महाविद्यालयांच्या सलंग्निकरणाच्या आणि परिसंस्थांच्या मान्यतेच्या शर्ती निर्धारीत करणे आणि त्या शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे याबाबत नियतकालिक किंवा अन्य प्रकारे मुल्यांकन करुन स्वतःची खात्री पटविणे अशीही जबाबदारी विद्यापीठांवर असल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व ८२३ महाविद्यालये आणि परिसंस्था यांचे शैक्षणिक परिक्षण करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे आणि कार्यबलाचे गठण करण्यात आले होते.यानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व सलंग्नित महाविद्यालांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर एकेडेमिक ऑडिट पोर्टलच्या रुपाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यामध्ये सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांच्या महाविद्यालयासंबंधी सर्व माहिती १५ जानेवारी २०२० पर्यंत भरणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार जवळपास ४०० हून अधिक महाविद्यालयांनी माहिती भरली आहे, मात्र ज्या महाविद्यालयांनी अजूनही माहिती भररेली नाही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण हे अनिवार्य असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.
महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण अनिवार्य ....!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:48 PM