'जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने क्वारंटाईन होणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:37 AM2021-11-29T07:37:30+5:302021-11-29T07:43:05+5:30
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात.
मुंबई - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन (Omicron Variant of Corona) नं जगभरात अनेक देशातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. या व्हेरिएंटमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमीक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने लोकांमध्ये पसरत असल्याचं WHO चं म्हणणं आहे. या व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग वेग 5 पटीने अधिक असल्याने काळजी घेण्याची अत्यंत गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे क्वारंटाईन
जगभरातील अतिगंभीर 13 देशांच्या नावांची यादी करण्यात येणार असून या देशांमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. पुणे, नागपूर, मुंबई यांसारख्या इंटरनॅशनल विमानतळावर आता या 13 देशांतून आलेल्या लोकांना सक्तीने क्वारंटाईन केलं जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जाणार, 8 दिवसानंतर दुसऱ्यांदा ही चाचणी घेतली जाणार आहे. यासह डोमेस्टीक एअरपोर्टवरही प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तपासले जाणार आहे. त्यांचीही 48 तासांपूर्वीची निगेटीव्ह चाचणी अहवाल पाहण्यात येईल, अशा सूचना दिल्याचे टोपे यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ओमीक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रमित करत आहे. या व्हेरिएंटबाबत आणखी अभ्यास सुरु आहे. त्याबाबत काही माहिती समोर आली तर त्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात येतील. आम्ही सतर्कता बाळगून आहोत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची ७२ तासांपूर्वीची RTPCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. कठोरपणे या प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यात येईल. परंतु अद्यापही या देशातून येणाऱ्या उड्डाणावर आपण बंदी आणली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहून कळवलंही आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
शाळा 1 डिसेंबर रोजीच सुरु होणार
ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्य सरकार १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार का? यावर राजेश टोपे म्हणाले की, १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नाही. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासोबत बैठक झाली. या बैठकीत शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबर रोजीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.