संगणक प्रयोगशाळेचा निधी गेला वाया
By admin | Published: January 14, 2015 02:49 AM2015-01-14T02:49:14+5:302015-01-14T02:49:14+5:30
हायटेक युगात शाळांमध्येही टॅब आणून विद्यार्थ्यांना हायटेक करण्याचे स्वप्न दाखविणा-या महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे संगणक प्रयोगशाळेसाठी मिळालेल्या निधीवर पाणी सोडण्याची वेळ ओढावली आहे़
शेफाली परब, मुंबई
हायटेक युगात शाळांमध्येही टॅब आणून विद्यार्थ्यांना हायटेक करण्याचे स्वप्न दाखविणा-या महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे संगणक प्रयोगशाळेसाठी मिळालेल्या निधीवर पाणी सोडण्याची वेळ ओढावली आहे़ राज्याच्या शिक्षण खात्याने याची गंभीर दखल घेऊन या निधीची परतफेड करण्याचा आदेश पालिकेच्या शिक्षण खात्याला दिला आहे़
सन २०१३ मध्ये राज्याच्या उप महासंचालनालयाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतेसाठी २७ लाख १२ हजार रुपये निधी मंजूर केला होता़ त्यानुसार १२ उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी हा निधी वापरणे अपेक्षित होते़ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर झालेला हा निधी मार्च २०१४ पर्यंत खर्च होणे अपेक्षित होते़ परंतु याबाबत राज्य सरकारने वारंवार पालिकेबरोबर पत्रव्यवहार करूनही या प्रकल्पाच्या दिशेने शिक्षण खात्याने वर्षभरात कोणतीच पावले टाकलेली नाहीत़
याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत हा निधी तत्काळ परत करण्याची नोटीस राज्याच्या उप महासंचालनालयाने पालिकेच्या शिक्षण खात्याला पाठविली आहे़ २०१३-१४ या वर्षात हा निधी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी वापरणे बांधनकारक असताना पालिकेने दाखविलेल्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा संतापही सरकारने व्यक्त केला आहे़