'संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबत 10 दिवसांत बैठक घेऊन निर्णय देणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 05:26 PM2018-12-01T17:26:46+5:302018-12-01T17:35:13+5:30
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेण्याच्या एकाच मागणीसाठी संगणक परिचालकांचे आंदोलन मागील चार दिवसांपासुन आझाद मैदान येथे सुरू होते.
मुंबई - राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेण्याच्या एकाच मागणीसाठी संगणक परिचालकांचे आंदोलन मागील चार दिवसांपासुन आझाद मैदान येथे सुरू होते. त्यावर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हा धोरणात्मक निर्णय असून येत्या 10 दिवसात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल, त्यांनी विधानपरिषदेत दिलेल्या उत्तरानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले.
राज्यातील आपले सरकार मध्ये काम करून मागील 7 वर्षात डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायम स्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मागील 4 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व पक्षाच्या सुमारे 82 आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले, की आय टी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय धोरणात्मक असून येत्या 10 दिवसात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पर्यावरणमंत्री कदम यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक ठेवली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंदोलन स्थळी येऊन भेट दिली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी फडणवीस यांनी विधान परिषदेच्या रेकॉर्ड वर दिलेले उत्तर व येत्या 10 दिवसात निर्णय देण्याचा शब्द दिला त्यानुसार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला
आझाद मैदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येत असलेले आंदोलक संगणक परिचालक यांनी दिवसरात्र आंदोलन केले. मैदानावर रात्रंदिवस आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. अनेक वेळा पोलीस व आंदोलकांमध्ये दररोज संघर्षाची वेळ येत होती. परंतु आंदोलकांच्या एकजुटीमुळे पोलिसांना नमते घ्यावे लागत होते.
अनेक अडचणींचा सामना करत आंदोलकांनी धैर्याने आंदोलन सुरू ठेवले!
संगणक परिचालकांचा मोर्चा भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा निघणार होता. परंतु मागील 25 जुलै 2016 रोजी दक्षिण मुंबई जाम केल्यामुळे आणि यावेळी ट्विटर मोर्चामुळे सोशल मीडियावर संगणक परिचालक आक्रमक झाल्यामुळे 27 रोजी मुंबई पोलिसांनी संगणक परिचालकांना सी एस टी रेल्वे स्टेशन,आमदार निवास, विधानभवन परिसरातून ताब्यात घेणे सुरू केले तसेच राणीबागेत हजारो संगणक परिचालकांना बंद केले. यामुळे पोलीस अधिकारी व सिद्धेश्वर मुंडे यांच्यामध्ये राणीबाग परिसरात बाचाबाची झाली त्यावेळी राणी बागेला छावणीचे स्वरूप आले होते. त्यानंतर आझाद मैदानात पेंडॉल टाकण्यास परवानगी न दिल्यामुळे दिवसभर उन्हात थांबून 4 दिवस आंदोलन केले.