लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमने युवतींसाठी नावीन्यपूर्ण योजनेची घोषणा केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांचा वाढता ऑनलाईन वापर पाहता भविष्यातील याबाबतची उद्योगसंधी हेरून युवतींना संगणक दुरुस्तीचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना थेट उद्योजक संधी देणारे व्यासपीठ सुरू होणार आहे.
युवतींच्या या विनामूल्य प्रशिक्षणासाठीचा ऑनलाईन अर्ज आणि त्याच्या पात्रतेचे निकष माविमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई व उपनगर परिसरात प्राथमिक स्तरावर सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी युवती मुंबईची रहिवासी व कोणत्याही शाखेची १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, असे माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितले. सामाजिक अंतर राखून प्रथम येणाऱ्या २५ युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी २० दिवसांचा असणार आहे. मुंबईतील हा उपक्रम यशस्वी झाल्यावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.