टेबल नसल्यामुळे संगणक धूळखात, स्थायी समितीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:19 AM2019-02-21T03:19:00+5:302019-02-21T03:20:35+5:30

स्थायी समितीचा आक्षेप : नवीन संगणकासाठी सात कोटींचा प्रस्ताव

Computer standing due to lack of table, standing committee objection | टेबल नसल्यामुळे संगणक धूळखात, स्थायी समितीचा आक्षेप

टेबल नसल्यामुळे संगणक धूळखात, स्थायी समितीचा आक्षेप

googlenewsNext

मुंबई : टेबल नसल्यामुळे चक्क साडेतीनशे संगणकांचा वापरच मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयात करण्यात
आलेला नाही, अशी धक्कादायक कबुली प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी दिली. जुने संगणक धुळखात असताना सात कोटी रुपयांचे नवीन संगणक खरेदी करण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. हा संगणक घोटाळाच असल्याचा संशय सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर स्थायी समितीने संबंधित प्रस्ताव राखून ठेवला आहे.

नायर रुग्णालयात ९४७ संगणक खरेदी करण्यात आले होते. यापैकी ५९० संगणक सुरू करण्यात आले, ३५४ संगणकांचा वापरच करण्यात आला नाही. तरीही नवीन संगणक खरेदी करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडला होता. यावर आक्षेप घेत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मागच्या बैठकीत माहिती मागविली होती. टेबल नसल्यामुळे ३५४ संगणक वापरण्यात आले नाहीत, असे अजब स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
मात्र संगणकांचा वापरच होत नसल्याने रुग्णांना आवश्यक आॅनलाइन सुविधा मिळत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. बाजारात संगणकांची किंमत प्रत्येकी ६० ते ७० हजार रुपये असताना पालिका दीड लाख किंमतीमध्ये संगणक का खरेदी करीत आहे? असा सवाल करीत यामध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला.

संगणकांच्या किमतींत तफावत
बाजारात एक संगणक ६० ते ७० हजार रुपयांना मिळतो. एक लॅपटॉप बाजारात ३० ते ४० हजार रुपये आहे. तरीही पालिका प्रशासन एका लॅपटॉपसाठी ८३ हजार रुपये खर्च करणार आहे.
प्रशासनाने २७८ लॅपटॉप खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे हे लॅपटॉप कोण वापरणार, संगणक व लॅपटॉप खरेदीचा प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

चौकशी होणार :

प्रशासनाने आणलेल्या नवीन प्रस्तावानुसार रेडिओलॉजीसाठी संगणक वापरण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जास्त क्षमतेचे वायफाय, जास्त स्टोरेज क्षमतेची यंत्रणा आणल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर समाधान न झाल्यामुळे याप्रकरणाची चौकशी करुन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

Web Title: Computer standing due to lack of table, standing committee objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई