Join us  

शिधापत्रिकांचे संगणकीकरण सुरु

By admin | Published: March 14, 2016 1:56 AM

महाराष्ट्र शासनाने लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून शिधावस्तू वितरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

कर्जत : महाराष्ट्र शासनाने लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून शिधावस्तू वितरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. सर्व शिधापत्रिका निर्धारित काळात संगणकीकरण करण्यासाठी महसूल विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी सर्व रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना सूचित करण्यात आले असून, पत्रिका संगणकीकरण करण्यासाठी १९ मार्च ही अखेरची तारीख शासनाने निर्धारित केली आहे. त्यामुळे सर्वांनी तात्काळ संगणकीकरणाचे अर्ज भरून देण्याचे आवाहन कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील सर्व शिधापत्रिकांची डाटा एंट्री करण्यात आलेली असून, शिधापत्रिकांचे संगणकीकरण फार्म्स संबंधित रास्त भाव दुकानामार्फत शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात आलेले आहेत. या फॉर्ममध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्र मांक, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी नोंद व कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा फोटो आदी माहिती भरून तो फॉर्म संबंधित रास्त भाव दुकानदाराकडे २९ फेब्रुवारीपर्यंत शिधापत्रिका जमा करणे आवश्यक होते. मात्र त्या काळात फॉर्म सादर न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांना संगणकीकृत फॉर्म मिळाला नसेल त्यांनी तत्काळ आपल्या रास्त भाव दुकानदाराकडे संपर्क साधून फॉर्म प्राप्त करून घ्यावे. फॉर्म १९ मार्चपर्यंत रास्त भाव दुकानदाराकडे जमा करण्याचे आवाहन पुरवठा विभागाचे अधिकारी दिनकर मोडक यांनी केले आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी सदर फॉर्म भरून दिलेला असेल, मात्र कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक जमा केले नसतील तर त्यांनी देखील तत्काळ रास्त भाव धान्य दुकानदारांकडे १९ मार्चपर्यंत जमा करावे. तसे न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका किंवा कुटुंबातील सदस्य रद्द होतील. त्यावेळी प्रशासन जबाबदार राहणार नाही. या संधीचा फायदा शिधापत्रिकाधारकांनी घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.